आशा - ASHA - Accredited Social Health Activist
आपल्या गावात काम करणाऱ्या आशा ASHA बद्दल आज सरळ सोप्या भाषेत समजून घेऊया.
भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्रत्येक गावात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशाची नेमणूक केली आहे. आशा कार्यकर्ता हि एक महिला असून ती बऱ्याच वर्षांपासून किंवा येणाऱ्या बऱ्याच वर्षापर्यंत गावात राहणारी, लग्न झालेली किंवा विधवा किंवा परित्यक्ता किंवा घटस्फोटीत स्वयंसेविका आहे. दहावी पास, २५ ते ४५ वय असलेल्या महिलेची आशा म्हणून ग्रामपंचायत नेमणूक करते. आदिवासी भागात आठवी पास आणि २० ते ४५ वय अशी पात्रता शिथिल केली आहे. आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक तर बिगर आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा नेमली जाते. गावातील लोक आणि आरोग्य केंद्र यातील दुवा म्हणून आशा काम करते.
ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा प्रशिक्षणासाठी पात्र ठरते. हे प्रशिक्षण ७+४+४+४+४ असे एकुण २३ दिवस अशा प्रकारे ५ सत्रात विभागलेले असते. प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आशा ला तिच्या कामगिरी वर आधारित प्रोत्साहनपर भत्ते प्राप्त होत असतात. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच आशा ला प्रोत्साहनपर भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते. आशा जरी स्वयंसेवक म्हणून काम करत असल्या तरी त्यांना त्यांच्या कामगिरीवर प्रोत्साहन म्हणून भत्ता दिला जातो. आशाच्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जाते. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिन्यातून होणाऱ्या बैठकीवेळी भत्ता दिला जातो.
आशा ला प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच ती ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देते शिवाय ताप, सर्दी, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करते. तसेच DOTS, Folic Acid सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आशा संबंधित यंत्रणेला त्वरित सूचना देते. ग्रामीण महिलांना बाळंतपणात सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास आशा सदैव तत्पर असतात.
अशी हि आशा, तुमच्या आमच्या गावात सदैव आपल्या मदतीला तयार असते.
No comments:
Post a Comment